महत्वाकांक्षा आणि आपण!

(To read this article in English Click Here)

कश्या काही गोष्टी आपल्या नकळत मनात घर घरून बसतात...

नील बऱ्याच दिवसांपासून ह्या शनिवार-रविवारची वाट बघत होता. कित्येक दिवसांनंतर त्याला हे दोन दिवस मोकळे मिळाले होते. त्याने खरं कुठलाच प्लॅन केलेला नव्हता. बाहेर सतत पाऊस सुरु असला तरी तो मात्र मजेत होता. शांतपणे घरात बसून चहाचा एक एक घोट घेत एन्जॉय करायचा त्याचा बेत होता. त्याच्या बायकोला मात्र दोन्ही दिवस सुट्टी नव्हती. दुपारच्या जेवणापर्यंत ती परत येणार होती. नीलने आनंदाने सकाळचा पूर्ण वेळ स्वतःसाठी ठेवला होता.

अजून अंथरुणातच आळसावत लोळण्यात मग्न असताना त्याचा फोन वाजला. त्याच्या बायकोचा कॉल होता. तिच्या गाडीचं टायर पंक्चर झालं होतं आणि ती त्याची कार घेऊन कामावर जाणार होती. "गेला माझा शनिवार" त्याने स्वतःशीच विचार विचार केला आणि फोन बाजूला ठेवला. "अश्या गोष्टी चुकीच्या दिवशी आणि चुकीच्या वेळीच का घडतात? हे टायर काल पंक्चर झालं असतं तर कमीत कमी मला पावसात जाऊन तरी ते बदलावं लागलं नसतं." मनातल्या मनात मर्फीच्या सिद्धांताला तो शिव्या देणार इतक्यात त्याला गाडीचा ओळखीचा आवाज गॅरेज मधून ऐकू आला. त्याला आवडणारा त्याच्या BMW चा आवाज! अंथरुणात डोळे मिटून पडला असतांना त्याला त्याची आवडती निळ्या रंगाची BMW विनासायास गॅरेज मधून निघतांना 'दिसली'.

क्षणात त्याचं मन भूतकाळात गेलं. जवळजवळ वीस वर्षांपूर्वीचा तो दिवस (जणू मागच्या जन्मी घडलेला), हॉस्पिटल मध्ये शिरताना नीलला गेटवर उभी असलेली ती निळ्या रंगाची कार आठवली. BMW कंपनीचं नुकतंच देशात आगमन झालं होतं. आणि हॉस्पिटलच्या मालकाने जणू मिरवण्यासाठीच ती नवी कार हॉस्पिटलच्या गेट मधेच पार्क केली होती. नीलला आजही त्या वेळच्या भावना स्पष्ट आठवत होत्या. त्या गाडीची घुमावदार रूपरेषा, तिच्या वेगाच्या कल्पनेनेच अंगावर उभं राहिलेलं रोमांच आणि ती आपल्या आवाक्याबाहेर असल्याची जाणीव होऊन आलेली निराशा! त्याला आजही त्यावेळची त्याची तळमळ स्पष्ट आठवत होती. आपल्या बाईकच्या चावीकडे बघून त्याने मनाशी निश्चय केला होता, 'एक दिवस नक्की'. कधीतरी त्याला वाटत असे की त्याचं पूर्ण आयुष्यच 'एक दिवस नक्की' वाल्या संकल्पांची मालिका झालं होतं!

नील सुरुवातीपासूनच महत्वाकांक्षी होता. पण त्याने स्वतःला कधीच महत्त्वाकांक्षेच्या ओझ्याखाली दबू दिलं नाही आणि आयुष्यात अल्पसंतुष्टीही येऊ दिली नाही. काळाच्या ओघात, वाढत्या वयासोबत, त्याच्या बाईक ची जागा कारने घेतली, कधी नवीन तर कधी सेकण्ड हॅन्ड! महत्वाकांक्षा आणि समाधान यांच्यातला समतोल आपोआप साधला जाऊ लागला. BMW बघितली की नेहमीच त्याच्या अंगावर रोमांच उभं राहत असे पण ती विकत घेण्याची तीव्र इच्छा त्याला कधीच झाली नव्हती. त्याच्या नकळत BMW त्याचं एक जगावेगळं स्वप्नं झालं होतं, जे त्याने हृदयाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवलं होतं, अश्या कोपऱ्यात ज्याला त्याने स्वतःपासून आणि इतरांपासूनही लपवून ठेवलं होतं. जणू कोपऱ्यात लपवलेल्या त्या आकांक्षांना प्रत्यक्षात आणण्याच्या प्रयत्नात त्या विरून तरी जातील किंवा त्यांचं ते स्वप्नवत वास्तव्य तरी हरवून बसेल, अशी भीती त्याला होती!

काही वर्षांपूर्वी नीलला जेव्हा नवीन कार घायची होती, साहजिकच त्याची स्वारी BMW च्या शोरूमकडे वळली. BMW चं बेसिक मॉडेल घ्यायचा बेत कधी चकाकत्या, इंजिनचा विशिष्ट धडाडणारा आवाज असलेल्या स्पोर्ट्स मॉडेल मध्ये बदलला हे त्याला कळलही नाही. BMW घेऊन घरी आणली तो दिवस आठवला की त्याला आजही आश्चर्य वाटतं. त्या दिवशी मनात कुठलं विचारचक्र सुरु होतं, कुठल्या भावना उचंबळत होत्या हे काहीच त्याला आठवत नव्हतं. पण ह्याच्या अगदी विरुद्ध, सुमारे वीस वर्षांपूर्वी पहिल्यांदा पाहिलेली ती निळी BMW आणि तो दिवस आजही त्याला स्पष्टपणे आठवत होता. स्वतःची गाडी घेतांना बायकोने दिलेला आधार आणि स्पोर्ट्स मॉडेल घेण्यासाठी तिने दिलेलं प्रोत्साहन त्याला आठवत होतं. त्याला आठवत होतं कसा त्याच्या मुलाला फक्त गाडीच्या रंगात तेवढा रस होता. BMW घेण्यासाठी जुनी टू सीटर स्पोर्ट्स कार विकल्याने त्याच्या पुतण्याला आलेली निराशा त्याला आठवत होती. त्याचे वडील Mercedes चे चाहते होते पण तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा अभिमान त्याला आठवत होता. शेजाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा हेवा, मित्रांचा आनंद आणि सहकाऱ्यांचा अलिप्तपणा हे सगळं त्याला आठवत होतं. पण त्याला स्वतःला त्या दिवशी काय वाटत होतं, हे मात्र तो पूर्णपणे विसरला होता.

त्याला नक्की आठवत होतं त्या दिवशी त्याला कुठल्याही आनंदाच्या उकळ्या फुटल्या नव्हत्या की एक जुनं स्वप्नं पूर्ण झाल्याचे आनंदाश्रू नव्हते की कुठला आनंदोत्सवही नव्हता. पुढच्या जवळपास वर्षभरात तो नव्या कार चे स्वप्न बघू लागला होता. काळाच्या ओघात ती BMW एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याचं एक सामान्य साधन झाली होती. अर्थात अजूनही नीलची ती आवडती कार होती. त्याच्यासाठी ती त्याच्या यशाचं, अभिमानाचं प्रतीक कधीच झाली नव्हती. ती फक्त एक कार होती, त्याच्या बायकोच्या Toyota सारखीच. पण आज का कुणास ठाऊक त्याला, हृदयाच्या त्या जुन्या कप्प्यात दडलेल्या, तरुण पणाच्या नील ची आठवण आली, जो, त्या निळ्या BMW ला बघून रोमांचित झाला होता.

स्वतःची ती छबी बघून नील भानावर आला. त्याला चहा घ्यावासा वाटला. त्या बहाण्याने लगेचच पावसात जाऊन टायर न बदलण्याचं आणखीन एक कारण त्याला मिळणार होतं. गरमागरम मसाला चहाचा एक एक घोट घेत तो विचार करू लागला, आज गाडीचा आवाज ऐकून तो का अस्वस्थ झाला होता? त्याची गाडी आणि तो गाडीचा आवाज त्याचे रोजचे सोबती होते. आज तो आवाज त्याच्यापासून दूर गेला होता. त्या आवाजाच्या दूर जाण्याने ही अस्वस्थता आली होती का? त्याच्या मनात आलं, आपल्या आशा, आकांक्षा आणि महत्वाकांक्षांचं पण असंच असेल? त्या शांतपणे आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात राहून नेहमीच आपली साथ देत असतात, कधीतरी त्या मनात कोलाहलही उठवतात पण आपल्याला ह्या कोलाहलाची सवय होऊन गेलेली असते आणि एकदा का त्या आपल्यापासून दूर गेल्या की मगच आपल्याला त्यांची जाणीव होते? तो हसला,आणि त्याने Toyota ची चावी हातात घेऊन कामाला सुरुवात केली...

~ Masala Chai.

The Bun Maska Corner

Four friends, strangers, and a bit of both, connected by a shared passion for writing... like four dots... each a part of the whole, yet each, whole in itself...

Random musings of restless minds are what you'll find here!

Previous
Previous

ऑटोमेशन

Next
Next

मृत्युंजय