ऑटोमेशन

(To read this article in English Click Here)

कधीतरी कुणासाठी न सांगता काहीतरी...

कालची रात्र हॉस्पिटल मध्ये खूप व्यस्त गेली होती. जवळजवळ रात्रभर मी एकापाठोपाठ एक सिरियस पेशंट हाताळत होतो. खूप थकवा आला असला तरी सगळे पेशंट बरे असल्याचं एक समाधान मात्र होतं. जेमतेम तीन चार तासाच्या झोपेनंतर माझ्या दिवसाची सुरुवात जरा निरूत्साहीच झाली होती. नेहमीपेक्षा मी उशिरानेच उठलो. आज पण दिवस भर माझ्या अपॉईंटमेंट्स होत्या. म्हणून रात्र व्यस्त जाऊनही मला वेळेवर हॉस्पिटल मध्ये पोहोचणं आवश्यक होतं. मी पटकन तयार झालो, नाश्ता आटोपला, माझं रोजचं News Podcast ऐकलं आणि दिवस सुरु करायला सज्ज झालो!

जसा मी माझ्या गाडीत शिरलो माझ्या फोनवरच्या मॅप्स ऍप वरून एक नोटिफिकेशन आलं. माझ्या नेहमीच्या रस्त्यावर अपघात झाल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. आणि मॅप मला एका वेगळ्या रस्त्याने जाण्याचा सल्ला देत होतं. ह्या रस्त्याने मला पंधरा मिनिटं जास्त लागणार होती पण ट्रॅफिक जॅम मध्ये अडकण्यापेक्षा हा पर्याय बराच होता आणि मी त्या मार्गाने निघालो. पंधरा मिनिट उशीर झाला पण मी विनासायास हॉस्पिटलला पोहोचलो. माझ्या सहकाऱ्याने मला दिवसभराचं वेळापत्रक सांगितलं. पूर्ण दिवस भरपूर काम असणार होतं. मी वेळ न घालवता कामाला लागलो.

सर्वात आधी माझा राऊंड संपला. रात्रीच्या काही सिरियस पेशंटच्या नातेवाईकांशी चर्चा करून मी ओपीडीत पोहोचलो. एकापाठोपाठ एक पेशंट तपासत ओपीडी छान लयीत सुरु झाली होती. सुमारे एक तास झाला असेल, आणि मला फोन वर आणखीन एक अलर्ट आला. माझ्या क्रेडिट कार्ड पेमेंट ची आज शेवटची तारीख होती. मागचा पूर्ण आठवडा मी इतका व्यस्त होतो की मला ह्या क्रेडिट कार्ड पेमेंट चा पूर्णपणे विसर पडला होता. माझ्या ई-मेल शी जोडलेल्या कॅलेंडर ऍपने माझं लक्ष ह्या तारखेकडे वेधलं होतं. मी दहा मिनिटं ओपीडी थांबवून ते पेमेंट पूर्ण केलं आणि पुन्हा सुरुवात केली. पुढच्या दोन तासात ओपीडी संपायला आली होती. माझ्यासाठी व्यस्त रात्र आणि पाठोपाठ त्याहून व्यस्त आणि थकवणारा दिवस गेला होता.

शेवटचा पेशंट तपासून मी खुर्चीत जरा रेंगाळलो आणि थोडा वेळ डोळे शांतपणे मिटून घेतले. पूर्ण लक्ष मी माझ्या श्वासावर केंद्रित केलं व मिनिटभर दीर्घ श्वसन केलं. अश्या छोट्या मेडिटेशन ब्रेक ने मला नेहमीच बरं वाटतं. मी मनातल्या मनात उरलेल्या कामांचा आढावा घेतला आणि माझा प्लॅन तयार केला. संध्याकाळच्या राऊंड नंतर मला माझा नेहमीचा व्यायाम करायचा होता. थकवणारा दिवस असला तरी माझी व्यायामाची शिस्त मला सोडायची नव्हती. राऊंड संपवतांना मी माझ्या स्मार्टवॉच कडे बघितलं. स्क्रीन वर नोटिफिकेशन होतं, ‘कालची तुमची झोप अपूर्ण होती आणि आजचा दिवस पण तणावग्रस्त होता, आज फक्त हलका फुलका व्यायाम तुमच्यासाठी बरा असेल.' मी हसलो. त्या स्मार्टवॉच ने माझी झोप आणि आज दिवसभर वाढलेला हार्ट रेट अचूक वेधला होता.

दिवसभराचं काम संपवता संपवता सकाळपासूनच्या घटना माझ्या डोळ्यासमोर आल्या. मॅप्स ऍप ने सुचवलेला सोयीचा रस्ता, कॅलेंडर ऍप ने अचूक वेळेवर दिलेली क्रेडिट कार्ड पेमेंट ची आठवण, माझ्या स्मार्टवॉच ने आजच्या दिवसासाठी सुचवलेला हलका व्यायाम! तंत्रज्ञानाची किती कमाल आहे नाही! आपल्या नकळत उपयुक्त माहिती, योग्य वेळी, न मागता हजर! हे तंत्रज्ञान बऱ्याचदा आपल्या खासगी माहितीचा दुरुपयोग करते ह्याचीही मला कल्पना आहे पण हे जे दैनंदिन आयुष्यात ऑटोमेशन त्यामुळे साधले जाते त्याला खरं तोड नाही! तेवढ्यात कुणीतरी दार ठोठावलं आणि माझं विचारचक्र तुटलं. माझ्या बायकोने माझी आवडती चॉकलेट घातलेली कडक कॉफी माझ्यासाठी पाठवली होती.

कॉफीचा पहिला घोट घेताच मला छान तरतरी वाटू लागली. मी बायकोला फोन केला आणि कॉफीबद्दल विचारले. खरंतर मी कॉफी मागवलीच नव्हती. तिने रिसेप्शनला कॉल करून माझा दिवस खूप व्यस्त असल्याची माहिती घेतली आणि मला बरं वाटावं म्हणून मी न सांगता माझी आवडती कॉफी माझ्यासाठी पाठवली. मला खूप छान वाटलं. आणि मग मनात आलं की हे आपल्या नातेसंबंधातलं ऑटोमेशन नाही का? माझा कॉफीचा अनुभव सकाळच्या तांत्रिक ऑटोमेशन पेक्षा जास्त आल्हाददायक नक्कीच होता! मला माझं लहानपण आठवलं. मनात कधीतरी शेवची भाजी खावीशी वाटायची आणि त्या दिवशी आईने नेमकी तीच बनवलेली असायची, माझा रूममेट मला बोर्नव्हीटा थंड आवडतं म्हणून नेहमी माझा ग्लास थंड झाल्यावरच मला द्यायचा. माझा मूड चांगला करण्यासाठी माझी गर्लफ्रेंड कशी तिचा सुंदर फोटो मला पाठवायची...अश्या अनेक घटना. माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझी काळजी घेणाऱ्या लोकांनी मी न सांगता माझ्यासाठी घेतलेले प्रयत्न! हे सगळं नात्यांमधलं इमोशनल ऑटोमेशन होतं आणि ते नेहमीच खुप आनंददायी आणि नाती घट्ट करणारं होतं.

तुम्ही कधी कुणासाठी असं इमोशनल ऑटोमेशन केलय? एकदा नक्की करून बघा. कुठलही कारण नसताना मित्र मैत्रिणींना एखादं गिफ्ट पाठवून बघा, दूरच्या एखाद्या मित्राला सहजच कुठल्याही कारणाशिवाय जाऊन भेटा, आई जर दुःखी दिसली तर तिला मिठी मारा...कुणासाठी तरी काहीतरी छान त्यांनी न मागता करा...खूप समाधान वाटतं!

~ Cheese Cake.

The Bun Maska Corner

Four friends, strangers, and a bit of both, connected by a shared passion for writing... like four dots... each a part of the whole, yet each, whole in itself...

Random musings of restless minds are what you'll find here!

Previous
Previous

Jeena Isi Ka Naam Hai - This is Life.

Next
Next

महत्वाकांक्षा आणि आपण!