मृत्युंजय

(To read this article in English click here)

एका उपेक्षित नायकाची कहाणी…

आयुष्यात सगळंच काही चांगलं आणि वाईट यात मोडता येत नाही. खरंतर चांगलं आणि वाईट या संकल्पनाच खूप मर्यादा घालणाऱ्या आहेत. आयुष्याचा खरा अर्थ तर या दोघांची सांगड घातल्यावरच उलगडतो. म्हणूनच महाभारत ही माझी आवडती कथा. असंख्य कहाण्या एकत्र गुंफून तयार झालेली कहाणी. आणि कुठलंही पात्र चांगलं किंवा वाईट या चौकटीत न बसणारं. कर्ण हे असच एक पात्र, ज्याने मला नेहमीच भुरळ घातली आहे .शिवाजी सावंतांचं 'मृत्युंजय' ही कर्णाची कहाणी.

तुम्ही म्हणाल, कर्णाची कहाणी तर सगळ्यांना माहीत आहे. त्यात नवीन ते काय? तो कुंतीचा पहिला पुत्र होता, पण कुंतीने त्याला त्यागले. आदिरथ आणि राधा यांनी त्याला मोठे केले. एक सूतपुत्र म्हणून तो वाढला. त्याला त्याचा हक्क कधीच मिळाला नाही, दुर्योधनाने त्याला नेहमीच पाठबळ दिलं आणि त्यानेही शेवटपर्यंत त्याची साथ सोडली नाही आणि ह्यामुळेच शेवटी तो इतिहासात चुकीच्या बाजुला नोंदला गेला. ही कहाणी ऐकून आपल्या मनात कर्णाची प्रतिमा एक अहंकारी, दुराग्रही व्यक्ती म्हणून तयार होते. पण मृत्युंजय ही कादंबरी वाचली की या साऱ्या संकल्पनांना तडा जातो. कर्ण त्याच्या सगळ्या गुण अवगुणां सहित, एक माणूस म्हणून आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो.

स्वतःची एक ओळख निर्माण करायला कर्ण आयुष्यभर झटला. तो एक शूर योद्धा होता, उदार मनाचा दानवीर होता, एका सक्षम नेत्याचे सर्व गुण त्याच्यात होते. कदाचित इतिहासाने गौरवान्वित केलेल्या पांडवांपेक्षाही जास्त समर्थ होता तो. पण एक सूतपुत्र म्हणूनच तो नेहमी ओळखला गेला. जातिव्यवस्थेची बंधने तो कधीच तोडू शकला नाही. या विडंबनेचे उदाहरण पुस्तकात कावळा आणि कोकिळेच्या स्वरूपात आढळते. कोकिळा तिची अंडी कावळ्याच्या घरट्यात घालते. कावळा ती अंडी स्वतःची समजून उबवतो, पण एकदा का अंड्यातून पिल्लू बाहेर आले की त्याच्या गोड आर्त स्वराने ते पटकन कोकिळेचे आहे हे जगाला समजते. कर्ण हा असाच कोकीळ होता, पण जगाने त्याला कधी 'कोकीळ' म्हणून ओळखलेच नाही.

आपल्याला आपल्या पात्रते प्रमाणे सामाजिक दर्जा मिळावा या अट्टाहासापायी त्याने कधी कधी विवादास्पद निर्णयही घेतले. पण या सगळ्या प्रसंगात त्याच्या बाजूने जर कोणी खंबीरपणे उभा राहिला, तर तो कौरव राजपुत्र दुर्योधन. म्हणूनच दुर्योधनासाठीची त्याची निष्ठा ही कधी कधी अंध भक्ती कडे झुकायची. कुंती ने जेव्हा त्याला ‘तू पांडवांच्या, आपल्या भावांच्या बाजूने लढ’ असे विनवले, त्यास त्याने स्पष्ट नकार दिला. पांडवांचा मोठा भाऊ म्हणून लढला असता तर, आयुष्यभर ज्यासाठी झटला , तो दर्जा , मान्यता, राजपद, हे सगळे त्याला मिळाले असते. पण त्याच्यासाठी त्याची निष्ठा आणि धर्म जास्त महत्वाचे होते.

कर्णाची कहाणी इतकी हृदयद्रावक आहे की त्याचा करुण अंत वाचायची माझ्या मनाची तयारीच नव्हती. अंत, ज्याला त्याचे आपलेच कारणीभूत होते आणि त्याचा धर्मही त्याला वाचवू शकला नव्हता. पण मृत्युंजयचा अंत वाचून मी म्हणेन की कर्ण या पात्राला न्याय मिळाला.

मृत्युंजयच्या शेवटच्या अंकाचं निवेदन कृष्णाने केलं आहे. कृष्ण, जो कर्णाच्या मृत्यूला अनेक प्रकारे कारणीभूत होता. तो सुद्धा कर्णाच्या मृत्यूवर अश्रू ढाळत म्हणतो, "माझ्या जीवनयात्रेत ज्यांच्या मूक भक्तीला, त्यागाला आणि प्रेमाला तोड नव्हती अशी माझी म्हणून खरी चारच माणसं होती. माता देवकी, राजमाता कुंतीदेवी, कर्ण आणि गोकुळातील राधा!!" आणि हे वाचून आपलेही डोळे ओलावतात.

या पुस्तकात लेखकाने आपल्या सुकुमार, संपन्न भाषेत फक्त कर्णाची कहाणीच नाही तर त्या काळातील सामाजिक समस्या, तत्वज्ञान, नैतिकता या सगळ्यांचही सुंदर विवरण केलंय. पण मला या पुस्तकात सगळ्यात जास्त काही आवडलं असेल तर ते प्रत्येक दृश्याचं कथन. एकेका वाक्यागणिक लेखक तुम्हाला हजारो वर्ष मागे, कुरुक्षेत्राच्या रणांगणात घेऊन जातो, हस्तिनापूरच्या महालात घेऊन जातो, गंगेच्या किनारी घेऊन जातो. तुम्ही ते रक्त, स्वेद, अश्रू सगळं अनुभवू शकता, गंगेला आपल्या श्वासात भरू शकता, ते दुःख अनुभवू शकता.

थोडक्यात सांगायचे तर 'मृत्युंजय' ही एका उपेक्षित नायकाची कहाणी आहे. आणि म्हणूनच कदाचित आपण ह्या कहाणीशी सहज जोडले जातो.

P.S. - या पुस्तकाचे अनेक भाषेत भाषांतरण झालेले आहे. इंग्लिश आणि हिंदी हि दोन्ही भाषांतरणं सुंदर आहेत.

~ Muffin.

The Bun Maska Corner

Four friends, strangers, and a bit of both, connected by a shared passion for writing... like four dots... each a part of the whole, yet each, whole in itself...

Random musings of restless minds are what you'll find here!

Previous
Previous

महत्वाकांक्षा आणि आपण!

Next
Next

आजोबा आणि झाड