आजोबा आणि झाड

(ही गोष्ट English मध्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

“माणसाचं आयुष्यं संपतं पण त्याच्या आयुष्याची कहाणी मात्र रेंगाळत रहाते आणि त्याचे ऋणानुबंधही...”

आमच्या गल्लीतल्या एका वृद्धाचं आज निधन झालं. रस्त्या पलीकडल्या जुनाटश्या घरात ते राहत असत. त्यांच्या घरासमोर त्या घराहूनही जुनं एक वडाचं झाड होतं. त्यांच्याकडे कमावून ठेवलेलं असं फारसं काही नव्हतं पण एक गोष्ट जी त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात होती, ती म्हणजे वेळ. वातानुकूलित ऑफिसच्या झगमगाटात दिवस रात्र एक करणाऱ्या आमच्या पिढीच्या अगदी उलट त्यांचा दिवस अगदी कासव गतीने पुढे सरकत असे. असं असलं तरी ते मुळीच रिकामटेकडे नव्हते, त्या वडाखाली त्यांची अनेक दैनंदिन कामे सतत सुरु असत. त्यांना घरापेक्षा ह्या वडाचाच मोठा आधार होता. रोज ऑफिसला जाताना मला ते एका हातात सिगारेट आणि दुसऱ्या हातात असलेलं वर्तमानपत्र चाळत बसलेले दिसत. मी परततांना पण ते तिथेच असत पण ह्या वेळी त्यांच्या सुरकुतलेल्या हातात वेगळं काहीतरी असे, कधी सिगारेटचं तुकडा, कधी ‘बिसोनी'(सुकलेल्या पानांपासून तयार केलेला पंखा), कधी चहाचा कप आणि जर नातवंड भेटायला आली असतील तर खेळणी सुद्धा!

ऑफिसला येताजाता माझं रोज त्यांच्याकडे आणि ते करत असलेल्या कामांकडे लक्ष जाऊ लागलं. प्रत्येक वेळी ते दिसले की त्यांच्या हातात काय दिसेल असं कुतूहल मला वाटू लागलं आणि ते काय करत असतील ह्याचा मनात अंदाज बांधण्याचा खेळ मी स्वतःशीच खेळू लागले. मला ते कधीच बोलताना नाही दिसले. ते पान खातांना दिसत, सिगारेट ओढतांना दिसत, आपली कामे करत त्या झाडाभोवती घुटमळताना दिसत, पण बोलतांना मात्र कधीच नाही. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असे. “कानको आज लाकूड घ्यायला आले होते”, “महिला समितीच्या मिटिंग मधून परततांना कानकोंनी सिगारेट साठी माझ्याकडून १० रुपये घेतलेत”; माझ्या सासूबाईंच्या अशा बोलण्यावरून मी त्यांना ओळखू लागले. एके काळी कानकोंचा नेटका संसार होता, सुंदर बायको होती, पण दुर्दैवाने बाळांतपणात तिचं निधन झालं. काही वर्षांपूर्वी त्यांना टीबी च्या आजाराने ग्रासलं होतं. त्यांच्या चार मुलांपैकी तीन बाहेरगावी स्थायिक झालेली आणि सगळ्यात लहानगा, ज्याचं अजून लग्न व्हायचं होतं तो गावी थांबून त्यांचा सांभाळ करत असे. कोपऱ्यावर असलेल्या छोटेखानी स्टेशनरीच्या दुकानातून होणाऱ्या तुटपुंज्या मिळकतीवर त्यांची गुजराण होई. असे अनेक उल्लेख माझ्या सासूबाईंकडून मला ऐकायला मिळत.

आयुष्यात कानकोंना फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या. दिवसाला तीन सिगारेट आणि काही कप चहा हाच त्यांचा आनंदाचा भाग! केस कापून व्यवस्थित ठेवणे, दाढी करणे ह्या त्यांच्यासाठी अनावश्यक गोष्टी होत्या. वर्षभर त्यांचा शर्ट, त्यांचं धोतर आणि त्यांचे केस आणि शरीर सुद्धा ते उन्हातान्हात आणि धुळीत माखू देत. मला मात्र त्यांच्या ह्या पेहेरेवात एक विलक्षण सौंदर्य दिसत असे. त्यांच्या तश्या दिसण्यातून,त्या जीर्ण झालेल्या शरीरातून मला त्यांनी जगलेल्या आयुष्याची, त्यांच्या आठवणींची - आनंदाच्या आणि दुःखाच्या सुद्धा, झलक दिसत असे. पण मला सगळ्यात जास्त साधर्म्य दिसत असे ते त्यांच्यात आणि त्या वडाच्या झाडात! हे झाड जणू त्यांचा एक भक्कम आधार म्हणून उभं होतं, त्यांना साथ देत होतं आणि त्यांच्या आशाआकांक्षाना जपत होतं. काही दिवसांपूर्वीच्या भर उन्हाळ्यात जेव्हा शरीराची लाहीलाही होत होती आणि घामाच्या धारा ओथंबून वहात होत्या, तेव्हा कानको आजोबांनी एका खाकी लुंगीशिवाय इतर सर्व वस्त्रांना रामराम केला. त्या झाडाच्या शीतल सावलीत बसलेली त्यांची ती उघडी, गर्द तपकिरी शरीरयष्टी आणि ते झाड जणू सहजपणे एकमेकात मिसळून गेले होते. काही क्षणांसाठी तर मला ते दोघे एकच असल्याचा भास झाला. डोळे चोळून मी स्वतःला भानावर आणलं. कानकोंच्या मनात काय विचार असतील? कुठल्या गोष्टींनी त्यांना आनंद होत असेल, दुःख होत असेल? हे माझं नेहमीचं कुतूहल. पण त्यांना मी कधीही आसपासच्या गोष्टींना भावनिक प्रतिसाद देताना बघितल नव्हतं. कदाचित ह्याबाबतीतही ते त्यांच्या झाडासारखेच होते. काल ऑफिस मधून परततांना नकळत माझी नजर वडाकडे गेली. आज तिथे कानको आजोबा नव्हते. शेजारची काही मंडळी वडाभोवती जमली होती. माझ्या सासूबाईही तिथे होत्या. दुपारीच झाडाखाली पडल्या पडल्या कानको आजोबांचं निधन झाल्याचं त्यांनी मला कळवलं.

तिथे त्या दिवशी कुणीही रडत नव्हतं किंवा दुःखही व्यक्त करत नव्हतं. वय झालं की निघून जायचं आणि नव्यासाठी जागा करून द्यायची हा निसर्गाचा नियम सगळ्यांनीच मान्य केलेला दिसत होता. जन्मापासून ते त्या दुपारी वडाखाली घेतलेल्या शेवटच्या श्वासापर्यंत कानकोंनी जीवनाचा मोठा प्रवास केला होता. मला आतून थोडं अस्वस्थ वाटू लागलं. मला ह्या घडलेल्या घटनेवर विश्वास बसत नव्हता आणि थोडा पश्चातापही होत होता. पश्चाताप ह्या गोष्टीचा की मी एकदाही त्यांचं बोलणं ऐकू नाही शकले. मला हे ही माहित नव्हतं की त्यांचं पूर्ण नाव श्री. कानकेश्वर रहांग होतं आणि आसामी दिनदर्शिकेनुसार त्यांचा जन्म ‘भादो’ महिन्याच्या १६ तारखेला शके १३४६ मध्ये झाला होता. कानकोंच्या पिढीसाठी हीच प्रचलित दिनदर्शिका होती. अंत्यसंस्काराच्या तयारीत सगळ्यात लहान मुलाला मदत करण्यात व्यस्त असलेल्या त्या गर्दीत मी स्तब्ध उभे होते. माझं लक्ष त्या वडाच्या झाडाकडे गेलं आणि मला अगदी भरून आलं. कानको आजोबांशिवाय ते झाड अगदीच पोरकं वाटतं होतं. जणू काही आजोबा म्हणजे त्या झाडाचा आत्मा होते. माझ्या मनात विचार आला “आपल्या पार्थिवाची विल्हेवाट कशी लावायची हे आपल्यालाच ठरवता आलं असतं तर?” कानको आजोबांची मृत्यूघटिका आल्यावर त्यांनी आपला निरोप घेऊन त्याच त्यांच्या खाकी लुंगीमध्ये ह्या झाडात सामावून जाणं किती योग्य ठरलं असतं नाही? त्यांचे गात्र झाडाने आपल्या फ़ांद्यामुळात सामावून घेतले असते. त्यांची गर्द तपकिरी निर्जीव त्वचा वडाच्या बुंध्याच्या सालीत नक्की एकजीव झाली असती. मला एकदा त्या दोघांना एकजीव होतांना बघायचं होतं. आजोबा आणि ते झाड खरं ‘सहजीवन' जगले होते. आज सकाळी ऑफिसला गाडीने निघाल्यावर माझं लक्ष आधी आजोबांच्या बसण्याच्या ठिकाणी आणि नंतर त्या वडाच्या झाडाकडे गेलं - श्री रहांग आम्हाला सोडून गेले होते पण ते झाड त्यांची समाधी म्हणून कायम तिथे असणार होतं.

~ Eclair.

The Bun Maska Corner

Four friends, strangers, and a bit of both, connected by a shared passion for writing... like four dots... each a part of the whole, yet each, whole in itself...

Random musings of restless minds are what you'll find here!

Previous
Previous

मृत्युंजय

Next
Next

‘I’ for Internet…‘I’ for Imagination