‘I’ for Internet…‘I’ for Imagination

(हा लेख English मध्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

अशा प्रकारे सुरु झाला बन मस्का कॉर्नर हा ब्लॉग…

'विजयादशमी २०२२' , या शुभ दिवशी आम्ही ‘बन मस्का कॉर्नर’ हा आमचा ब्लॉग प्रकाशित केला. कुठल्याही नवीन प्रोजेक्ट बद्दल असते तशीच धाकधूक आमच्या या ब्लॉग बद्दल पण आमच्या मनात होती. सुरुवातीला प्रतिसाद कसा आहे याचा अंदाज घेण्यासाठी आम्ही या ब्लॉग ची लिंक जवळच्या काही लोकांसोबत शेयर केली आणि आम्हाला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. अगदी सुरुवातीपासूनच सगळ्यांनी ब्लॉग वाचून, लेखांवर प्रतिक्रिया देऊन तर काही वेळा मेसेज आणि कॉल्स करून आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.

या ब्लॉग वर लिहिणारे आम्ही चौघे अगदी वेगवेगळ्या प्रांतात राहणारे. आणि म्हणूनच हा ब्लॉग चार अगदी विभिन्न ग्रुप्स मध्ये शेयर झाला. आणि असं असलं तरी सगळीकडून आलेली पहिली सामान्य प्रतिक्रिया होती ती या वेबसाईट च्या सुंदरतेबद्दल. सुरुवातीच्या सगळ्याच वाचकांना वेबसाईट आणि लेखांची मांडणी दिसायला खूपच आवडली होती. मग पुढचा साहजिक प्रश्न विचारला जात होता आणि तो म्हणजे ’ही वेबसाईट कोणी तयार केली?’ आणि आनंदाने आणि अभिमानाने आम्ही सगळ्यांना सांगत होतो की ही वेबसाईट आम्हीच तयार केली. आम्ही वैद्यकीय पेशातले असल्याने ह्या उत्तराने सगळेच चकित होत होते!

या ब्लॉगची सुरुवात खरंतर आमच्या मैत्रीमुळे झाली. साधारण २००० साली आमची योगायोगाने गाठ पडली. आणि तेव्हापासून आजपर्यंत अनेक संस्मरणीय क्षण आम्ही सोबत घालवले. एक धमाल कॉलेज लाईफ आम्ही जगलो. माझ्या सगळ्यात जवळच्या मित्राची इच्छा होती की शिक्षण पूर्ण करून आम्ही एकत्र एक हॉस्पिटल सुरु करावं म्हणजे आमची कॉलेजची संगत आयुष्यभर सोबत राहील. आज मागे वळून बघताना कळतंय की त्याची ही कल्पना किती सुंदर होती. पण दुर्दैवाने पुढे गेल्यावर तसं प्रत्यक्षात होऊ शकलं नाही.

सुरुवातीला पदव्युत्तर शिक्षणासाठी आणि नंतर आयुष्याच्या प्रवाहासोबत आम्ही वेगवेगळ्या मार्गांना लागलो. वेळेसोबत आमच्यातलं भौगोलिक अंतर पण वाढतच गेलं. पण नशीबाने आजचं जग हे ‘कनेक्टेड' जग आहे. म्हणूनच वाढत्या अंतरासोबतही आमची मैत्री तशीच कायम राहिली. आणि या मैत्रीसोबतच एकत्र येऊन काहीतरी करण्याची आमची इच्छा सुद्धा! अगदी सुरुवातीपासून मला कल्पना होती की मनातले विचार सोप्या शब्दात आम्ही लिहू शकू आणि म्हणूनच मित्रांचा एक एकत्र ब्लॉग असावा असं अनेक वर्षांपासून माझ्या मनात होतं. पण ही कल्पना प्रत्यक्षात मात्र उतरत नव्हती. Covid ने खरंतर माझे डोळे उघडले. आयुष्य किती अनिश्चित असू शकतं हे खूप जवळून बघायला मिळालं. आणि मग माझ्या मनातल्या या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी काम सुरु करावं असं मनापासून वाटू लागलं. लगेचच मी मित्रांना कॉल केले आणि सगळ्यांनाच ही ब्लॉगची कल्पना खूपच आवडली!

आता आम्हाला हवी होती ती आमची वेबसाईट! अशी वेबसाईट जिथे आम्हाला आमच्या मनाप्रमाणे पाहिजे त्या वेळी आमचं लेखन प्रकाशित करता येईल. म्हणून इतर कुणावर अवलंबून न राहता अशी वेबसाईट स्वतःच बनवणं आम्हाला योग्य वाटलं. आणि त्यादृष्टीने आम्ही Youtube वर शोध सुरु केला. वेबसाईट बनवण्याच्या अनेक ट्युटोरिअल्स आम्हाला Youtube वर मिळाल्या. आणि ह्याच शोध मोहिमेतून आम्हाला Squarespace बद्दल माहिती मिळाली. जवळपास सगळ्यांचंच म्हणणं होतं की वेबसाईट बनवण्यासाठी Squarespace हे सगळ्यात सोपं माध्यम आहे आणि आम्ही तेच निवडण्याचा निर्णय घेतला.

पण लक्षात आलं की Squarespace ही पेड सर्व्हिस आहे. सुदैवाने त्यांची १५ दिवसांची फ्री ट्रायल होती आणि आम्ही ह्याचाच फायदा उचलायचं ठरवलं. आम्ही आमची ट्रायल घेतली आणि Squarespace Templates च्या प्रयोगांना सुरुवात केली. योगायोगाने आम्हाला असं एक Template मिळालं ज्याने आमच्या होऊ घातलेल्या वेबसाईटचं पूर्ण चित्रच आमच्यासमोर उभं केलं. ह्यात सर्वात आश्चर्यचकीत करणारा भाग हा होता की Squarespace वर कुठल्याही प्रकारच्या तांत्रिक ज्ञानाशिवाय तुम्ही वेबसाइट तयार करू शकत होता. गरज होती ती फक्त मनात आपली वेबसाईट चितारण्याची आणि त्यानुसार आपल्या Template मध्ये बदल करण्याची. ही सगळी प्रक्रिया इतकी साधीसरळ आणि मजेदार होती की बघताबघता दोन दिवसांत आमची प्राथमिक वेबसाईट तयार झाली. त्यानंतर मग आमच्या गरजांविषयी चर्चा होत गेल्या आणि त्यानुसार आम्ही ही वेबसाईट सुशोभित करत गेलो आणि सुमारे एका आठवड्यात ही सध्याची साईट नावारूपास आली!

या ब्लॉग वर लिहिलं जाणारं लिखाण हे आमच्या मनातल्या कल्पनांचं प्रतिबिंब असणार होतं. ह्या सगळ्या कल्पना व्यक्त होणं आमच्यासाठी खूप महत्वाचं होतं. तसंच अश्या एखाद्या कल्पनेबद्दल काही लिहिता येईल का? त्या लेखासोबत कुठला फोटो चांगला दिसेल? अश्या अनेक चर्चा पण कराव्या लागणार होत्या. आम्हाला असं पडद्यामागे सतत बोलत राहावं लागणार होतं. आणि मग अशा चर्चांसाठी आम्ही Signal Messenger वर एक ग्रुप बनवला (आम्हाला वाटतं Signal Messenger privacy च्या दृष्टीने WhatsApp पेक्षा खूप चांगला आहे). आमच्या असं लक्षात येऊ लागलं की Signal वर होणाऱ्या गप्पाटप्पांमधून आमच्या लेखांचे अनेक विषय समोर येत होते. जशी जशी ब्लॉगच्या प्रकाशनाची तारीख जवळ येत होती, आम्हाला काही महत्वाचे निर्णय वेगाने घेणं गरजेचं होतं. फक्त चॅट द्वारे होणाऱ्या चर्चा त्यासाठी पुरेश्या नव्हत्या. मग आम्ही Zoom च्या मदतीने काही ऑनलाईन मिटींग्स घेतल्या. Zoom वर सगळ्यांसोबत स्क्रीन शेयर करून आम्हाला वेगाने वेबसाईटचे बारकावे निश्चित करता आलेत. सरतेशेवटी ब्लॉग प्रकाशित झाला आणि आमचं लिखाण प्रकाशित करणं सुरु केलं.

प्रत्येक लेख प्रकाशित करण्यासाठी अनेक गोष्टींवर काम करावं लागतं होतं. कच्चा मसुदा लिहिणे, त्यावर सगळ्यांचा अभिप्राय घेऊन प्राथमिक बदल करणे, मग त्या मसुद्याचं संकलन करणे, लेखासोबतचा फोटो निवडणे, शीर्षक निवडणे, सोशल मीडिया साठीचे मजकूर तयार करणे; प्रत्येक लेख प्रकाशित करण्यामागे असे अनेक पैलू जोडलेले होते. आणि ह्या सगळ्या पसाऱ्यासाठी आमचा Signal ग्रुप आणि Zoom ही दोघंही माध्यमं कमी पडायला लागली होती. आम्हाला असं एक माध्यम शोधायचं होतं जिथे आम्ही सर्व आपापल्या ठिकाणांवरून एकत्र काम करू शकू. आणि मग पुन्हा थोडा ऑनलाईन शोध घेतल्यावर आम्हांला Trello विषयी माहिती मिळाली. आता ह्या ब्लॉग वर प्रकाशित होणारं सगळं लिखाण सुरुवातीपासून शेवटपर्यंत Trello वर तयार होतं आणि त्यासाठी आमची पूर्ण टीम Trello वर एकत्र काम करू शकते!

आणि अशा प्रकारे हा ‘बन मस्का कॉर्नर’ ब्लॉग जन्माला आला आणि आता तो वाढू लागलाय. हा ब्लॉग प्रत्यक्षात येऊ शकला तो फक्त इंटरनेट च्या जगात आपण वावरत असल्यामुळेच. या ब्लॉग चा भक्कम पाया असलेली आमची मैत्री टिकून राहिली ती इंटरनेट मुळे मिळालेल्या सहज कनेक्टिव्हिटी मुळे. वेबसाईट स्वतः तयार करण्यापासून पुढे समोर आलेली प्रत्येक समस्या सोडवतांना आणि मनात आलेली प्रत्येक कल्पना साध्य करतांना प्रत्येक टप्प्यावर आंम्हाला इंटरनेटची प्रचंड मदत झाली. आयुष्य जगण्यासाठी किती मजेशीर काळ आहे ना हा? तुम्ही कुठलीही कल्पना मनात आणा आणि थोडी मेहेनत करायची तयारी ठेवा - इंटरनेट तुमच्या मदतीला नेहमी तयार आहेच!

~ Cheese Cake.

The Bun Maska Corner

Four friends, strangers, and a bit of both, connected by a shared passion for writing... like four dots... each a part of the whole, yet each, whole in itself...

Random musings of restless minds are what you'll find here!

Previous
Previous

आजोबा आणि झाड

Next
Next

काँटॅक्ट लिस्ट