काँटॅक्ट लिस्ट

(To read this article in English Click Here)

माझ्या काँटॅक्ट लिस्टमध्ये दडलेल्या आठवणी…

पंधरा दिवसांपासून चाललेलं विचारचक्र, ऑनलाईन शिकलेल्या अनेक गोष्टी, विविध वेबसाइटस् बनवणाऱ्या सेवांचा अभ्यास, काय लिहावं? सोशल मीडिया कसा हाताळावा? अशा अनेक विषयांवरच्या चर्चा! हा सगळा सोपस्कार पार पडल्यावर शेवटी हा ब्लॉग प्रकाशित झाला. सुरुवातीला (जरा घाबरतच! ) हा ब्लॉग मी जवळच्या काही व्यक्तींना दाखवला आणि मी ‘लिहितो’ हे समजल्यावर अनेकांना धक्काच बसला. हे तसं अपेक्षितच होतं. माझं लिखाण हे आजपर्यंत माझ्यापुरतचं मर्यादित होतं. कित्येकदा तर माझ्या डायरीत लिहिलेलं तेवढचं! अगदी क्वचित जवळच्या काही मित्रांना वाचायला मिळालेलं. पण आता ब्लॉग वर लिहायचं ठरवल्यावर आणखी काही लोकांना ह्याबद्दल कळवावं असं मला वाटू लागलं. एकदा आपली काँटॅक्ट लिस्ट चाळून एक व्हॉट्सऍप ब्रॉडकास्ट बनवावा असा विचार मनात आला. त्यावेळी मला जराही कल्पना नव्हती की माझी ही काँटॅक्ट लिस्टची सफर माझ्या आयुष्यातल्या गेल्या दोन दशकांची उजळणी ठरेल.

काँटॅक्ट लिस्ट चाळू लागल्यावर पहिला नंबर,ज्यावर मी हसून थांबलो तो सेव्ह केला होता, तो ‘आईस्क्रीम’ म्हणून! ‘आईस्क्रीम’ नाव आणि नंबर ह्या शिवाय इतर कुठलीही माहिती त्यात नव्हती. हा नंबर मी कॉलेज मध्ये असतांना सेव्ह केलेला. मुख्य रस्त्यावर रोज गाडी लावून आईस्क्रीम विकणाऱ्या एकाचा हा नंबर होता. मला आजही त्याचं नाव माहित नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, कि मी हा नंबर का सेव्ह केला? ह्या एका नंबर सोबत माझ्या कित्येक आठवणी जुळलेल्या आहेत. हे आईस्क्रीम म्हणजे रोज ताजं बनवून आणलेलं अतिशय चविष्ट आईस्क्रीम! कुठल्याही नावाजलेल्या आईस्क्रीम ब्रॅंडला लाजवेल अस्सं! हॉस्टेल मधली माझी रूम म्हणजे धमाल अड्डा होती. आणि वेळेचं काहीही भान न ठेवता हि धमाल सतत सुरु असे. रोजचे नव-नवीन बेत ठरायचे, कधी जवळच्या धाब्यावरचा चहा, कधी सँडविच, कधी चायनीज, कधी लस्सी तर कधी आईस्क्रीम! हो, हेच ठरलेलं ते गाडीवरचं आईस्क्रीम! त्याच्याकडचे अंजीर, मावा, गुलकंद हे आइसक्रीमचे प्रकार म्हणजे आमचा जीव की प्राण! एकदा तिथे पोहोचलो की विविध प्रकारच्या आइस्क्रीमच्या अनेक फेऱ्या होत. कित्येकदा हॉस्टेलवर क्षुल्लक विषयांवर गरमागरम वादविवाद होत असे, आणि अशा वादाची सांगता हमखास आईस्क्रीमच्या बेताने होई. मग मध्यरात्र असो की अगदी पहाट, हा नंबर डायल करुन आम्ही आईस्क्रीम खायला पोहोचत असू. हा आईस्क्रीमवाला अगदी झोपेतून उठून आम्हाला आईस्क्रीम खाऊ घालत असे. आपल्या आईस्क्रीमच्या चाहत्यांना बघून त्याच्या पेंगुळलेल्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि समाधान पसरत असे. आजही ही आईस्क्रीमची गाडी असेल का? त्याची चव अजूनही तेवढीच मस्त असेल का? मला बघितल्यावर तो मला ओळखेल का? आज हा नंबर बघितल्यावर असे अनेक प्रश्न मनात आले आणि मी तिथे जाऊन या प्रश्नांची उत्तरे शोधायचा बेत आखू लागलो.

काँटॅक्ट लिस्ट मध्ये पुढे काही नंबर आलेत. त्या सगळ्यांपुढे माझ्या शाळेचं नाव होतं. हे सगळे माझ्या शाळेतले सवंगडी. मी शाळेत असतांना आणि नंतर कॉलेजच्या सुरुवातीच्या काळात मोबाईल फ़ोन नव्हते. तो काळ लँडलाइन फोनचा होता, ज्याचा वापर फक्त महत्त्वाच्या कामांसाठी होत असे. दहावीनंतर मी गाव सोडून शहरात पुढच्या शिक्षणासाठी गेलो. माझे सवंगडी मात्र गावातच राहिले. त्याकाळी आम्ही एकमेकांना पत्र पाठवत असू. आंतरदेशीय पत्र! आज चोवीस वर्षांनंतरही ती सर्व पत्रे मी सांभाळून ठेवली आहेत. सुवाच्य हस्ताक्षरात लिहिलेली, सुशोभित केलेली, निरागस प्रेमाने भरलेली ही पत्रे! आज ह्या सर्व सवंगड्यांची मला खूप आठवण आली. आज क्षणात मी मोबाईल उचलून त्यांच्याशी बोलू शकतो, मेसेज करू शकतो किंवा ईमेल करू शकतो...पण आयुष्याच्या वाटचालीत हरवलेलं ते निरागस प्रेम मला पुन्हा सापडेल?

मग जे नंबर आले ,त्यांत माझ्या पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या संस्थेचं नाव होतं. माझ्या जीवनाचा कायापालट करण्याऱ्या काळाचे साक्षीदार. ह्या काळात मला आयुष्याला सामोरं जाण्याचा आत्मविश्वास मिळाला. हे नंबर बघून मला माझ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष आठवले. कसा मी थरथरत्या आवाजात आणि लटलटत्या पायांनी माझ्या वरिष्ठांना फोन करत असे. कधी कधी तर काय बोलायचं याचा सराव करुन मग मी फोन लावत असे. जसा जसा काळ पुढे गेला मी कामात सराईत होत गेलो. काळाच्या ओघात थोडं ज्ञान आणि थोडं कौशल्य आत्मसात केलं. आणि मग मी तेच नंबर आत्मविश्वासाने डायल करायला लागलो. जेव्हा मी माझ्या वरिष्ठांकडून ऐकलं की "तू इमर्जन्सी हाताळ, आता तू तैयार झाला आहेस, तुझ्या आवाक्या बाहेरचं काही असेल, तरच मला कॉल कर", अश्या वाक्यांनी कुठलीही परिस्थिती हाताळण्याचा आत्मविश्वास मला दिला. आजही काही वेळा मी हे नंबर डायल करतो आणि गुरु-शिष्य या नात्याचा निखळ आनंद घेतो.

आणि शेवटी काही नंबर असे आले, जे मी आयुष्याच्या एका टप्प्यावर सगळ्यात जास्त वेळा डायल केलेले. फक्त बोलण्यासाठीच नव्हे तर काही संकेतांसाठी सुद्धा! एक मिस्ड कॉल म्हणजे खिडकीतून डोकाऊन निरोप देण्यासाठी , दोन मिस्ड कॉल म्हणजे खाली येऊन सिनेमा किंवा बाईकवर फिरायला जाण्यासाठी असे ठरलेले संकेत. दिवसातून किती वेळा हे नंबर डायल व्हायचे त्याची गणतीच नव्हती. त्या काळी हे नंबर माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होते. आणि आता? ते फक्त माझ्या काँटॅक्ट लिस्ट मध्ये पडून आहेत. अनेक वर्षात ते डायल केल्याचं मला आठवतही नाही. आयुष्याच्या प्रवाहासोबत पुढे जातांना एके काळी अगणित वेळा डायल केलेले हे नंबर माझ्या काँटॅक्ट लिस्ट मधली एक औपचारिकता कधी झाले, हे मला कळलही नाही!!

तुम्ही तुमच्या काँटॅक्ट लिस्टला कधी पुन्हा भेट दिली आहे? मी आवर्जून तुम्हाला हे करायला सांगेन. मला खात्री आहे तुमच्या अनेक स्मृतींना यातून उजाळा मिळेल. तुमची एखादी आठवण आमच्यासोबत नक्की शेयर करा.

~ Cheese Cake

The Bun Maska Corner

Four friends, strangers, and a bit of both, connected by a shared passion for writing... like four dots... each a part of the whole, yet each, whole in itself...

Random musings of restless minds are what you'll find here!

Previous
Previous

‘I’ for Internet…‘I’ for Imagination

Next
Next

गुलज़ार साहब और मैं!