मजा टेनिसची

(हा लेख English मध्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

आज का कुणास ठाऊक पण खूप थकल्यासारखं आणि निरस वाटत होतं. अगदी कशातच स्वारस्य वाटत नव्हतं. जणू काही सगळंच संपल्यासारखं! सागर किनारी पाण्यात पाय टाकून उभं असताना ओझरत्या लाटेसोबत पायाखालून वाळू सरकत जावी आणि ती धरून ठेवण्यासाठी काहीच न करता यावं तसा अगतिकपणा! आयुष्यात सगळं ठीक आहे हा खंबीर विश्वासच ढळून गेलेला!

का कुणास ठाऊक पण असं बऱ्याच दिवसांपासून चाललं होतं. आणि ह्या सगळ्यामुळे मी अगदी अलिप्त होत चाललो होतो. काहितरी वेगळा विचार करावा किंवा एखादा नवीन प्रोजेक्ट हाती घ्यावा अशी कुठलीच इच्छा होत नव्हती. जणू अचानक एखादी शितलहर यावी आणि एखादी लाट अर्ध्यातच गोठून जावी, अधुरी, गारठलेली, न वाहणारी आणि न तुटणारी!

आणि ह्या विचारात असतांनाच माझा फोन वाजला - मेसेज आला होता. नवीनच झालेला हा माझा मित्र. आमच्या ठरलेल्या टेनिस प्रॅक्टिस साठी त्याला उशीर झालाय असा तो मेसेज. माझ्या ह्या निरस मनस्थितीमध्ये मी मागच्या आठवड्यात आखलेल्या ह्या बेताबद्दल पूर्णपणे विसरलो होतो. पण मित्राला उशीर झालेला म्हणजे मला अजूनही ग्राउंड वर पोहोचणं सहज शक्य होतं.

मला असं वाटतं की एखाद्या अनोळखी माणसाबद्दल किंवा नवीन ओळख झालेल्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात एक औपचारिकता असते, आपण अशा माणसांना सहजासहजी दुखवू शकत नाही. हीच औपचारिकता माझ्यासाठी प्रेरणा ठरली. हाच बेत एखाद्या माझ्या जिवलग मित्रासोबतचा असता तर मी क्षणाचाही विचार न करता तो टाळला असता. पण साधी तोंडओळख असणाऱ्या व्यक्तीला निराश करण्याच्या विचाराने मी खडबडून जागा झालो. नशिबाने मी खेळण्यायोग्य वेषातच होतो, माझी टेनिस किट नेहमी गाडीतच असते आणि मैदानही खूप दूर नव्हते. शेवटी मी मैदानावर पोहोचलो, तसा थोडा उशीराच पण एका छोट्या माफीत काम होईल तेवढाच उशीर!

तो माझ्यापेक्षा बराच चांगला खेळणारा होता. पण मीही बऱ्यापैकी सामना केला. गुण मोजण्याच्या भानगडीत न पडता आम्ही मजेसाठी आणि व्यायाम व्हावा म्हणून खेळलो. मला स्वतःलाच मी किती चांगला खेळलो ह्याचं आश्चर्य वाटून गेलं - तसं ह्यात फार विशेष काही नाही, स्वतःला चकित करण्यात माझा हात कोणीच धरू शकत नाही! पण त्याहून महत्वाचं म्हणजे हा एक तास मला सगळं खूपच छान वाटलं. ती गारठलेली लाट विरघळून पुन्हा वाहू लागली होती आणि तीही शांतपणे! माझा क्षीण जाणवेनासा झाला होता. उलट मी अगदी ताजातवाना झालो होतो. मनातला रितेपणा पूर्ण गेला नव्हता पण आता मला जगाचा अंत दिसत नव्हता!

प्रत्येक वेळी खेळाच्या मैदानावर पाऊल ठेवताच माझ्यासोबत हे कसं होतं ह्याचं मला आश्चर्य वाटतं. कुठलाही खेळ खेळत असतांना आपण आपले विचार पूर्णपणे खेळावर केंद्रित करतो. अशावेळी आपण फक्त तो क्षण जगत असतो. इतर कुठलीच गोष्ट आपल्या मनात येत नाही. काल माझ्यासोबत काय घडलं, आजची सकाळ कशी गेली, संध्याकाळचा बेत कसा असेल, असे कुठलेच विचार मनाला शिवत नाहीत. तुम्ही फक्त त्या एका क्षणात जगत असतात आणि त्या क्षणात काय करायचं याचाच विचार करतात! आणि अशा प्रकारे एक तास घालवण्यासारखं सुख माझ्यासाठी तरी दुसरं कुठलचं नाही! खांद्यावरून रोज वाहून न्यावं लागणारं एखादं ओझं काढून ठेवावं असा हा प्रकार! तसा एक तास म्हणजे खूप मोठा काळ नाही, पण मनातलं वादळ शमवून ते आल्हाददायक होण्यासाठी हा एक तास पुरेसा होता. माझ्यासाठी खेळाचं मैदान हा तास घेऊन येतं, इतरांसाठी एखाद्या पुस्तकाचं वाचन तर काहींसाठी निसर्गात मारलेला फेरफटका असा अनुभव आणत असतो! असा एक आनंदाचा एक तास आपल्या आयुष्यात कुठला छंद आणू शकतो हे शोधणं, त्याचं संगोपन करुन वाढवणं हे प्रत्येकाचं काम आहे!

तुम्हाला त्या एका क्षणात जगण्याची मजा काय केल्याने मिळते मला नक्की कमेंट्स मध्ये सांगाल!

~ मसाला चाय

~ अनुवाद - चीझ केक

The Bun Maska Corner

Four friends, strangers, and a bit of both, connected by a shared passion for writing... like four dots... each a part of the whole, yet each, whole in itself...

Random musings of restless minds are what you'll find here!

Previous
Previous

गुलज़ार साहब और मैं!