लाईफ

(To read this article in English Click Here)


कहाणी प्रेमाची, आयुष्याची आणि आयुष्यावरच्या प्रेमाची!

ऑफिसमधला एक व्यस्त दिवस संपवून घरी येईपर्यंत इरा खूप थकली होती . खांद्यावरची बॅग टेबलवर ठेवताच तीचं लक्ष तिथे पडलेल्या पत्रांच्या ढिगावर गेलं. आणि  एक निश्वास टाकून ती खुर्चीवर बसली.

काही गोष्टी ती अगदी प्रकर्षाने टाळत होती. तिला माहीत होतं, ही न उघडलेली पत्रं , त्याची न आवरलेली रूम, त्याचं कपाट, हे सगळं तिला त्याची आठवण करून देणार होतं. आणि म्हणूनच तिच्या मनाची तैयारी होत नव्हती या वेदनेच्या डोहात उतरायची. शक्य होतं का तिला त्याच्या आठवणीतून मुक्त होणं?

आणि नेहमीप्रमाणे, तो दिवस तिच्या डोळ्यासमोरून सरकू लागला. नको असतांनाही त्या दिवसाचा एक एक क्षण तिला अगदी काल घडल्यासारखा आठवत होता. ऑफिसमधून थकून आल्यावर आपला कॉफीचा मग हातात घेऊन इरा नुकतीच बसली होती. आणि तिचा फोन घणघणला. जरा वैतागूनच तिने तो उचलला. तिला अपेक्षित होतं की हा एखादा रोबो कॉलर किंवा टेलिमार्केटिंग वाला असेल. पण तो कोणा अनोळखी व्यक्तीचा आवाज होता. गडबडीत तो काय बोलतोय, तिला कळेना. तिला फक्त तुटक तुटक शब्द कळत होते, आणि शब्दागणिक तिची खुर्चीवरची पकड जास्तच आवळली जात होती. "सिद्धार्थ" "अपघात" "कस्तुरबा हॉस्पिटल". पांढऱ्याफटक पडलेल्या तिच्या चेहऱ्यावर काही भावही उरले नव्हते.

तिने निराशेने मान हलवली. जणू असे केल्याने त्या भयानक दिवसाच्या सगळ्या आठवणी पानगळी सारख्या गळून पडणार होत्या! कारण आजही त्या दिवसाचे नाव काढताच तिच्या अंगावर शहारे उभे राहत होते.

त्या दिवशी फोन खाली ठेवल्यावर इराने पटापट ३-४ फोन केले. विवेकला, टॅक्सी ड्रायव्हरला, काही मित्रांना. आपलं डोकं आणि मन स्पष्ट आणि शांतपणे कसं काम करतंय याचं तिला आश्चर्य वाटलं. हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत तिने बऱ्याच गोष्टींची जुळवाजुळव करून ठेवली होती. बहुदा येणाऱ्या कठीण परिस्थितीचा विचार करावा लागू नये म्हणून ती मनाला गुंतवून ठेवत होती.

हॉस्पिटलला पोहोचताच तिला विवेक भेटला. त्याने बरंचसं पेपर वर्क उरकलं होतं. ते दोघं आता फक्त डॉक्टर काय बातमी घेऊन येताहेत याची वाट बघत होते. चांगली असो वा वाईट, त्यांना काहीतरी माहिती हवी होती. ही अनिश्चितता जीवघेणी होती. बऱ्याच वेळाने डॉक्टर शेवटी बाहेर आले. त्यांचा चेहरा बघितल्याबरोबर इराने ओळखले, की बातमी चांगली नाही. पण असून असून किती वाईट असणार होती बातमी? ती मनाने खंबीर होती. वाईट परिस्थितीला सामोरं जायला ती घाबरत नव्हती.

एका हातात विवेकचा हात घट्ट पकडून ती सज्ज झाली. पण जसे डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केली, इराचे मन सुन्न झाले. तुटक तुटक शब्द तिच्या कानी पडत होते....सिद्धार्थच्या डोक्याला खूप मार बसलाय. ब्रेन डॅमेज सिव्हिअर आहे... ब्रेन ऍक्टिव्हिटी नाही.... ब्रेन डेड़....त्या शब्दांच्या पुरात जणू ती बुडून गेली. आणि अचानक एक शब्द ऐकून ती भानावर आली - "ऑर्गन डोनेशन ". डॉक्टर त्यांना ऑर्गन डोनेशन बद्दल विचारात होते.

इराला काही वर्षांपूर्वीचा एक दिवस आठवला. सिद्धार्थ हा तिचा आणि विवेकचा एकुलता एक मुलगा. एक दिवस असंच गप्पांच्या ओघात ऑर्गन डोनेशन चा विषय निघाला होता. जेवणाच्या टेबलवर मारलेल्या या गप्पा तिला खुप आवडायच्या. ते तिघं एकत्र येऊन आपापले अनुभव, मत, आयडिया शेयर करायचे . या गप्पांमधूनच ती सिद्धार्थ सोबत कनेक्ट करू शकायची. त्या तरुण मनाकडे कितीतरी होतं शिकण्यासारखं आणि शिकवण्यासारखं. त्यांच्या कॉलेज मध्ये चालू असलेल्या ऑर्गन डोनेशन ड्राईव्ह बद्दल तो त्या दिवशी बोलत होता. इराने त्याला सहजच विचारलं, "तू एनलिस्ट करणार आहेस?" "हो " उत्साहाने त्याने उत्तर दिलं. "का?" तिने विचारलं. ती काही ऑर्गन डोनेशनच्या विरोधात नव्हती, पण तिला कारण जाणून घ्यायचे होते. "आयुष्य किती सुंदर आहे मम्मा आणि या सुंदर आयुष्याला कोणी का मुकावं? मी जर त्यांना हे आयुष्य जगण्यास मदत करू शकलो, तर का नाही?" क्षणात कौतुकाने आणि प्रेमाने इराचा कंठ दाटून आला. तिच्यासमोर एक जाणता, समजूतदार तरुण उभा होता, ज्याला आयुष्याची कदर होती!

पण आज सिद्धार्थच्या ऑर्गन डोनेशन चे फॉर्म हातात येताच, अवघं आयुष्य हातातून निसटून चाललंय असं वाटू लागलं इराला. परिस्थिती काय आहे आणि काय करायची गरज आहे हे समजून घ्यायच्या मनस्थितीतच नव्हती ती . इरा स्वतः एक रेजीस्टर्ड ऑर्गन डोनर होती. पण, प्रेमाने जोपासलेल्या आपल्या मुलाचे शरीर कापून त्याचे अवयव वाटून द्यावे हे ठरवणं खूप अवघड होतं तिच्यासाठी! विशेषतः त्याचे बोलके, मोठे डोळे, जे नेहमीच लक्ष वेधून घ्यायचे. त्या लुकलुकणार्या डोळ्यांशिवाय ती सिद्धार्थच्या चेहऱ्याची कल्पनाच करू शकत नव्हती. पण मनातून तिला माहीत होते, सिद्धार्थ जर इथे असता, तर शक्य तो प्रत्येक ऑर्गन त्याने डोनेट करायला लावला असता. म्हणूनच शेवटी इराने जड अंतःकरणाने फॉर्मवर सही केली.

त्याचा  निरोप घेणं हे इरासाठी अशक्य होतं . म्हणूनच कि काय, पण तिने एकही अश्रू ढाळला नव्हता. तिला भीती होती की ती पूर्णपणे कोलमडून जाईल. दिवस सरत गेले, पण ही जखम काही भरू शकली नाही. म्हणून तिने त्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले. भरेल ती आपोआप या आशेनं.

पण तिला माहीत होतं, यातून बाहेर पडायचा एकच रस्ता आहे. या दुःखाला सामोरं जाणं. म्हणून आज तिने ठरवलं, अवघड असलं तरी, एक एक करून ती ही सगळी कामं संपवणार होती. तिने पत्राच्या ढिगातून एक पत्र उचललं‌‌. ऑर्गन डोनेश‌न कौन्‌सिल कडून होते ते पत्र. सिद्धार्थच्या एका रेसिपीएंट कडून आलेले आभार पत्र!
"आयुष्य हे खूप सुंदर आहे. अवयवांचे एक मशीन बनून जगण्यासाठी नाहीये ते. ते अनुभवण्यासाठी आहे. तुमच्या मुलाच्या नेत्रदानामुळे हा अनुभव शक्य झालाय माझ्या मुलीसाठी! ती खऱ्या अर्थाने पूर्ण झाली आहे. तुमचे  आभार मानायला किंवा सांत्वन करायला माझ्याकडे शब्द नाहीयेत. पण एकच सांगतो, त्या डोळ्यातली चमक आजही तशीच आहे!"

आणि हळूच एक अश्रू इराच्या गालावरून ओघळला.

~ Muffin

The Bun Maska Corner

Four friends, strangers, and a bit of both, connected by a shared passion for writing... like four dots... each a part of the whole, yet each, whole in itself...

Random musings of restless minds are what you'll find here!

Next
Next

Jeena Isi Ka Naam Hai - This is Life.