जीना इसी का नाम है!

(To read the translation of this article in English Click Here)

का आपण काहीतरी चांगलं करण्यासाठी विनाकारण काहीतरी वाईट होण्याची वेळ येऊ देतो…?

मुंबईचं T2 आंतरराष्ट्रीय विमानतळ, सकाळी सात ची फ्लाइट असल्याने मी खूप लवकरच उठलो होतो. जेमतेम चोवीस तासांचीच ट्रिप असल्याने माझ्याकडे फार काही सामान नव्हते. फ्लाईटच्या वेळेच्या बऱ्याच अगोदर मी सगळ्या औपचारिकता पूर्ण करुन माझ्या गेट कडे चालू लागलो. हे T2 विमानतळ खूपच देखणं आहे. सगळीकडे सुबक दुकानांचा नुसता झगमगाट! त्या झगमगाटातून चालत मी माझ्या नेहमीच्या आवडत्या कॅफे पर्यंत पोहोचलो. “सगळं एयरपोर्ट इतकं सुंदर का सजवलेलं असतं? माझ्यासारखी सगळ्यांनाच विमान प्रवासाची आत कुठेतरी भीती असेल आणि अश्या विचारांवरून लक्ष घालवण्यासाठी हा सगळा सोपस्कार असेल का?” माझी कॉफ़ी समोर आली आणि मी माझ्या बालिश विचारांना आवर घातली. सकाळची कॉफ़ी म्हणजे माझ्या मनासाठीचं टॉनिक! संथपणे एक एक घोटाचा आनंद घेत आपल्या विचारांमध्ये बुडून जाणं हा माझा नित्यनियम.

मी माझ्या एका मित्राला भेटायला निघालो होतो. गेल्या काही वर्षांपासूनची आमची घनिष्ट मैत्री, पण मागचं एक वर्ष खूपच वाईट गेलं. छोट्या छोट्या गोष्टींवरून आमचे काही वाद झाले आणि हळूहळू ते वाढतच गेलेत. एके काळी माझा मित्र म्हणजे माझं सर्वस्व होता आणि आज आमच्यातलं अंतर इतकं वाढलं होतं की ही मैत्री टिकेल का अशी शंका येऊ घातली होती. आयुष्यातल्या अगदी छोट्याछोट्या गोष्टी एकमेकांसोबत शेयर करणारे आम्ही दोघं आज अनेक दिवसांचा अबोला धरून बसलो होतो. “अशी एकदा जमलेली घट्ट नाती खरच कायमची तुटतात का? आपल्या आयुष्यात इतक्या खोलवर रूजलेली माणसं अशी कायमची निघून जाऊ शकतात का? आणि असं त्यांना सहजासहजी निघून जाऊ द्यायचं असतं का?” अश्या अनेक प्रश्नाचं वादळ गेल्या काही दिवसांपासून मला अस्वस्थ करत होतं. आणि एकदा माझ्या मित्राला प्रत्यक्ष भेटून, समोरासमोर बोलून सगळे वाद मिटवावेत, आयुष्यात एखादया वेळीच होणारी अशी दुर्मीळ मैत्री पुन्हा रुळावर आणावी असा विचार करुन मी त्याला प्रत्यक्ष भेटायला निघालो होतो आणि काही तासातच माझी फ्लाइट निघणार होती. माझ्या मित्राचं शहर म्हणजे निसर्ग सौंदर्याने पुरेपुर प्रेक्षणीय स्थळ. आमची मैत्री पूर्ण बहरात असतांना कितीदातरी त्याने मला त्याच्याकडे येण्याचं आमंत्रण दिलं होतं. पण कामाच्या व्यस्ततेमुळे तो बेत कधी आखलाच गेला नाही. आणि जेव्हा सरतेशेवटी मी निघालो होतो तेव्हा सगळी परिस्थितीच बदलली होती. माझी कॉफ़ी संपवता संपवता विचार आला की जर ही ट्रिप मी सगळं चांगलं असतांनाच केली असती तर? किती धमाल मजा आली असती. कायमच्या कितीतरी आठवणी त्यात पेरल्या गेल्या असत्या! मी माझा कप खाली ठेवला आणि माझ्या फ्लाइटच्या गेट कडे चालू लागलो.

मैत्रीविषयी कुठलेही विचार मनात आले की मला ‘दिल चाहता है’ ह्या सिनेमाची नेहमी आठवण येते (आणि ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ ची सुद्धा). ‘दिल चाहता है’ ही समीर सिद्धार्थ आणि आकाश ह्या तीन घनिष्ट मित्रांची कहाणी. एखादं मनापासून काढलेलं चित्रं असो, एखादं होऊ घातलेलं प्रेमप्रकरण असो, मनात आलेला एखादया ट्रिपचा प्लॅन असो, किंवा रोजच्या छोट्या मोठ्या घटना, असं सगळच सोबत शेयर करणारे हे तिघे जीवलग मित्र. कळत नकळत आठवणींचा खजिना तयार करत जाणारी धमाल मैत्री. ह्या सिनेमाच्या पूर्वार्धात तुम्हाला तुमच्या सगळ्यात जवळच्या मित्रांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि मग सिद्धार्थचं ते वेगळ्या पठडीतलं प्रेमप्रकरण आणि त्यावरुन आकाशशी होणारं भांडण आणि एक थप्पड! इथपासून तुटणारी मैत्री आणि दिवसागणीक वाढत जाणारा दुरावा. तिघांचा आपआपल्या आयुष्यात व्यस्त होऊन सगळं मागे सोडून द्यायचा प्रयत्न पण मनात सुरु असणारी कायमची धुसमुस आणि जीवघेणी ताटातूट. अनेक वर्षानंतर हे तिघे पुन्हा भेटतात. सिद्धार्थची प्रेयसी मृत्यू शय्येवर असतांना दुःखाचा डोंगर समोर असतो आणि अश्या वेळी त्याला आपल्या सगळ्यात जवळच्या मित्रांची आठवण येते आणि तो त्यांना कॉल करतो. ते दोघेही पूर्वीचं सगळं विसरून आपल्या मित्राची साथ देतात आणि त्यांची मैत्रीपण पूर्वपदावर येते. “सिद्धार्थने प्रचंड दुःख समोर आल्यावर आपल्या मित्रांना तो कॉल केला, तो जर थोडा आगोदरच केला असता तर? जर अशी दुःखाची परिस्थिती नसती तर ते तिघे पुन्हा एकत्र आले असते?” एव्हाना मी विमानात बसलो होतो आणि काही मिनिटात माझ्या फ्लाइट ने टेक ऑफ घेतला.

टेक ऑफ पूर्ण करुन विमान जरा स्थीर झालं आणि मी डोळे लाऊन पुन्हा माझ्या विचारात मग्न झालो. सुमारे चार वर्षांपूर्वीचा घटनाक्रम माझ्या डोळ्यांसमोर आला. माझ्या बायकोला (खरं तर माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीला) कपाळाजवळ जन्मापासूनच एक गाठ होती. पण काही महिन्यांपासून ती गाठ मोठी होऊ लागली म्हणून ऑपरेशन करुन ती काढून घ्यावी असा सल्ला मिळाला आणि तसं ऑपरेशन पार पडलं. काढलेली ती गाठ तपासणीसाठी पाठवली गेली. सुमारे एक आठवड्यानंतर लॅब मधून एक कॉल आला. त्या गाठीत कॅन्सर सारख्या पेशी असाव्यात अशी दुर्मिळ शंका त्यांना वाटली होती आणि ती गाठ ताबडतोब मोठ्या लॅबला खात्रीसाठी पाठवावी असा सल्ला त्यांनी दिला. अगदी ध्यानीमनी नसतांना अचानक माझ्यावर आभाळ कोसळलं. तिला धीर द्यावा की स्वतःचे अश्रू सावरावे असा संभ्रम. त्या रात्री मी तिच्याजवळ बसून तिचा हात हातात घेऊन तिला सांगितलं, “आपण रिटायरमेंट साठी ठेवलेले सगळे पैसे काढून घेऊ आणि तुझी जी जगाची सफर करायची ईच्छा आहे ती लगेच पूर्ण करुन घेऊ.” पुढे सुदैवाने त्या गाठित कॅन्सर नसल्याचं सिध्द झालं आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. एक जंगी पार्टी पण केली आणि दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा मी माझ्या दैनंदिन कामात व्यस्त झालो. आज विमानात डोळे लाऊन विचार करतांना मला तो जगाची सफर करण्याचा प्लॅन आठवला. कॅन्सर चा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याबरोबर मी पूर्णपणे तो विसरलो होतो. सगळं छान चाललेलं असतांना मी कसा तो प्लॅन विसरू शकलो? अस्वस्थ होऊन माझी तंद्री तुटली आणि मी डोळे उघडले. विमानात लँडिंग ची घोषणा झाली होती आणि काही मिनिटात विमान लँड झालं.

लँड झाल्याझाल्या मी माझा फोन सुरु केला आणि माझ्या मित्राला मी पोहोचलो असल्याचा मेसेज केला. माझी बॅग घेऊन मी विमानतळाबाहेर आलो आणि समोरच हसऱ्या चेहऱ्याने माझं स्वागत करायला माझा मित्र उभा होता. जवळ येताच नकळत आम्ही एक घट्ट मिठी मारली. मला त्याच्या शहरात प्रत्यक्ष आलेलं बघून त्याला प्रचंड आनंद झाला होता. आम्ही त्याच्या गाडीत बसलो आणि तडक मला आवडेल अश्या प्रकारच्या हॉटेल मध्ये जेवायला पोहोचलो. त्याने तिथे आधीच टेबल बुक करुन ठेवला होता. माझ्या ह्या छोट्याश्या ट्रिपचा त्याने खूप विचार करुन प्लॅन केला होता. मला कायकाय आवडेल ह्याची बारीकसारीक सगळी तयारी त्याने करुन ठेवली होती. ते सगळं बघून असं वाटू लागलं की आमचं मुळी भांडण झालंच नव्हतं. आमची मैत्री इतकी घट्ट होती की त्या पहिल्या मिठीत सगळा द्वेष संपला होता. मला वाईट फक्त एका गोष्टीचं वाटतं होतं की ही मिठी मारणयासाठी त्याच्यापर्यंत पोहोचण्यास मी बराच उशीर केला होता. परिस्थिती टोकाला जाईल पर्यंत थांबायची खरतर गरंजच नव्हती.

पण दरवेळीच आपण अशी परिस्थिती टोकाला जायची वाट बघतो आणि आयुष्याचा बराच चांगला काळ दुःखात घालवून बसतो. काहीतरी चांगलं करण्यासाठी विनाकारण काहीतरी वाईट होण्याची वेळ येऊ देतो! तुमचा असा एखादा मित्र हरवला आहे? असेल तर वेळ न दवडता त्याला आजचं कॉल करा कारण ‘यें जिंदगी ना मिलेगी दोबारा’!

~ Cheese Cake.

The Bun Maska Corner

Four friends, strangers, and a bit of both, connected by a shared passion for writing... like four dots... each a part of the whole, yet each, whole in itself...

Random musings of restless minds are what you'll find here!

Previous
Previous

Jeena Isi Ka Naam Hai - Part 2

Next
Next

Automation